संविधान चौकाची तातडीने पुनर्स्थापना करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पिंपरी-चिंचवड, दि. १९ ऑक्टोबर २०२६ : जुनी सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची कथित विनापरवानगी तोडफोड केल्याप्रकरणी निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संविधान चौकाची तातडीने पुनर्स्थापना करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेने केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
भारतीय संविधान हे देशातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचे प्रतीक आहे. त्यामुळे संविधानाच्या प्रास्ताविकेशी संबंधित सार्वजनिक स्मारकाची तोडफोड झाल्याचा आरोप गंभीर असून, या प्रकरणातील सत्य जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे ‘आप’ने निवेदनात म्हटले आहे.
संविधान चौकातील तोडफोडीचे आदेश कोणी दिले, ही कारवाई कोणाच्या उपस्थितीत करण्यात आली आणि त्यासाठी महापालिका प्रशासनाची किंवा संबंधित सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी होती का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे, कामाचे आदेश, परवानगीची कागदपत्रे आणि इतर संबंधित पुरावे सुरक्षित ठेवून त्यांची तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, व्यक्ती किंवा संबंधित ठेकेदारांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. संविधानाच्या प्रास्ताविकेची पूर्वीच्या स्वरूपात किंवा त्यापेक्षा अधिक सन्मानपूर्वक पद्धतीने तातडीने पुनर्स्थापना करावी. तसेच चौकशी अहवाल आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संविधानाच्या सन्मानासाठी आंदोलनाचा इशारा
संविधानाचा सन्मान राखणे ही नागरिकांसह प्रशासनाचीही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करावी. प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास संविधानाच्या सन्मानासाठी लोकशाही व शांततामय मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.
यावेळी ‘आप’चे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, यशवंत कांबळे, युवा अध्यक्ष विकी पासोटे, महिला नेत्या कविता कोंडे देशमुख आणि कामगार आघाडीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने उपस्थित होते.
