डॉ. वैभव मस्के यांच्यासह संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणी; रुग्णालयाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) शवविच्छेदन विभागात कथित मद्यपान पार्टी झाल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉ. वैभव मस्के यांच्यासह कथित पार्टीत सहभागी असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मारुती भापकर यांच्याकडून करण्यात आली आहे.
भापकर यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनानुसार, मृत व्यक्तीचे नातेवाईक प्रमाणपत्रासंदर्भात डॉ. वैभव मस्के यांच्या कार्यालयात गेले असता, तेथे टेबलवर मद्याने भरलेले ग्लास, खाद्यपदार्थ आणि जेवणाची ताटे दिसून आल्याचा आरोप आहे. संबंधित डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत सोफ्यावर झोपलेले होते, तसेच प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्या नातेवाइकांशी योग्य पद्धतीने संवाद साधला जात नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या कथित प्रकारामुळे महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या सार्वजनिक रुग्णालयातील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना दुःखाच्या प्रसंगी आवश्यक कागदपत्रांसाठी रुग्णालयात जावे लागते. अशा वेळी त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळणे अपेक्षित असताना, अशा प्रकाराचे आरोप समोर येणे गंभीर मानले जात आहे.
निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करा
या प्रकरणातील उपलब्ध व्हिडिओ चित्रण, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे वस्तुस्थिती तपासावी. कथित मद्यपान पार्टीत सहभागी असलेल्या सर्व संबंधितांची चौकशी करून आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी. गंभीर गैरवर्तन सिद्ध झालेल्या संबंधितांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत चौकशी आणि प्रशासनाची भूमिका समोर आल्यानंतरच आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेते आणि संबंधितांवर काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
