‘बळीराजाच्या पाठीशी महायुती सरकार खंबीर’; कर्जवसुलीला लगाम आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णयाचे स्वागत
पिंपरी-चिंचवड : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णयाचे स्वागत करत भाजपचे पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच कर्जवसुलीच्या तगाद्याला लगाम घालणे, दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याच्या उपाययोजना स्वागतार्ह असल्याचे काटे यांनी म्हटले आहे.
राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असून, या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य जमा करण्याच्या निर्णयामुळे बळीराजाला मोठा आधार मिळेल, असा विश्वास काटे यांनी व्यक्त केला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जनावरांसाठी पुरेसा चारा, चारा पिकांचे नियोजन आणि हमीभावाने चारा खरेदी यांसारख्या उपाययोजनांमुळे दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे काटे यांनी नमूद केले.
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयही महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याबाबतच्या सवलती आणि शेतकरी कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आर्थिक योजनांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटक सरकारच्या मदतीपेक्षा महाराष्ट्राची मदत दुप्पट असल्याचा दावा
महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीची घोषणा केली असताना, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ अडीच हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केल्याचा दावा काटे यांनी केला. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात राज्य सरकारने तातडीने मदतीचा निर्णय घेणे महत्त्वाचे असून, शेतकरीहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले.
पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि प्रधानमंत्री पीकविमा योजना अशा विविध योजनांचा उल्लेख करत काटे म्हणाले की, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. पात्र शेतकरी कुटुंबांना वार्षिक सन्मान निधीच्या माध्यमातून मिळणारी मदतही महत्त्वाची आहे.
दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती असून, अशा संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. या प्रश्नावर राजकारण करण्याऐवजी विरोधकांनीही शेतकरीहिताला प्राधान्य द्यावे आणि महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले.
“राजकारण सोडून दुष्काळमुक्तीच्या संकल्पाला साथ द्या!”
“पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी योजना, शेतकरी कर्जमुक्तीच्या उपाययोजना आणि दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. हा केवळ तात्पुरता दिलासा नसून महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या व्यापक संकल्पाचा भाग आहे. अशा गंभीर परिस्थितीत विरोधकांनी निरर्थक राजकारण न करता बळीराजाच्या हितासाठी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,” असे आवाहन भाजपचे पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले.
