संदीप वाघेरे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; खरेदी दरांची अधिकृत पडताळणी करण्याची मागणी
पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २ कोटी ७७ लाख ५६ हजार रुपये अंदाजित किमतीच्या डिजिटल रेडिओग्राफी मशीनच्या खरेदी प्रक्रियेतील दरांची अधिकृत पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये खरेदी करण्यात आलेल्या समान उपकरणांच्या किमतींची तुलना करून निविदेतील दर वाजवी आहेत का, याची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
महापालिकेच्या ई-निविदा क्रमांक GEM/2026/B/7797530 अंतर्गत 1000 MA Digital Radiography System या वैद्यकीय उपकरणाची अंदाजित किंमत २ कोटी ७७ लाख ५६ हजार रुपये नमूद करण्यात आली आहे. या किमतीसाठी कोणते बाजारभाव, दरपत्रके, पूर्वीचे शासकीय खरेदी व्यवहार आणि आर्थिक निकष विचारात घेण्यात आले, याचे सविस्तर विश्लेषण करण्याची मागणी वाघेरे यांनी केली आहे.
विविध राज्यांतील खरेदी दरांची तुलना करण्याची मागणी
वाघेरे यांनी निवेदनात नमूद केलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे डिसेंबर २०२१ मध्ये संबंधित मशीन सुमारे १ कोटी १२ लाख रुपये किमतीत पाच वर्षांच्या वॉरंटीसह पुरविण्यात आले होते. तसेच, २०२५ मध्ये राजस्थानमधील कोटा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे उपकरण सुमारे १ कोटी ४० लाख रुपये किमतीत पुरविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील खरेदी व्यवहारांमध्ये अमरावती जिल्हा रुग्णालयात सुमारे २ कोटी ४९ लाख ५२ हजार ३७५ रुपये, वाशी जनरल हॉस्पिटलमध्ये २ कोटी ७७ लाख ५६ हजार रुपये, तर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात सुमारे ३ कोटी ७९ लाख रुपये किमतीची नोंद असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, या किमतींची तुलना करताना संबंधित मशीनचे मॉडेल, तांत्रिक वैशिष्ट्ये, अतिरिक्त उपकरणे, स्थापना खर्च, वॉरंटी, देखभाल करार आणि कर यांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित संस्थांचे मूळ खरेदी आदेश व तांत्रिक कागदपत्रे तपासून दरांतील तफावत स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘प्राइस अॅनालिसिस’ करून वस्तुस्थिती स्पष्ट करा!
महापालिका प्रशासनाने संबंधित उपकरणाचे Price Analysis आणि Rate Analysis करून निविदेतील अंदाजित किंमत वाजवी आहे का, हे स्पष्ट करावे. तसेच, निविदेतील तांत्रिक अटी व शर्ती वस्तुनिष्ठ, पारदर्शक आणि स्पर्धात्मक आहेत का, याचीही नियमानुसार तपासणी करावी, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.
याशिवाय, संबंधित मूळ उत्पादक कंपनीकडून अधिकृत लेटरहेडवर स्वाक्षरी व शिक्क्यासह लेखी खुलासा घेऊन विविध शासकीय संस्थांना पुरविण्यात आलेल्या उपकरणांच्या किमती, वॉरंटी आणि देखभाल कराराची माहिती मिळवावी. आवश्यकतेनुसार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फतही या खरेदी व्यवहारांची तुलनात्मक पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सार्वजनिक निधीच्या योग्य विनियोगावर भर
महापालिकेच्या निधीतून होणाऱ्या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत गुणवत्ता, योग्य बाजारभाव आणि पारदर्शकता यांना प्राधान्य मिळाले पाहिजे. अधिकृत कागदपत्रांच्या आधारे खरेदी दरांची पडताळणी केल्यास सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग सुनिश्चित करण्यास मदत होईल, असे वाघेरे यांनी स्पष्ट केले.
चौकशीत अंदाजित किंमत अवाजवी असल्याचे किंवा निविदा प्रक्रियेत नियमबाह्य बाबी आढळल्यास नियमानुसार निर्णय घेण्यात यावा. आवश्यक असल्यास सुधारित तांत्रिक निकष आणि योग्य बाजारभावाच्या आधारे पारदर्शक व स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्याचाही विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी वाघेरे यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी महापालिका आयुक्तांकडेही निवेदन दिले होते. त्यावर झालेली कार्यवाही आणि चौकशीचे निष्कर्ष लेखी स्वरूपात कळविण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर आरोप करणे हा उद्देश नसून, खरेदी व्यवहारांची अधिकृत पडताळणी व्हावी, महापालिकेच्या निधीची बचत व्हावी आणि खरेदी प्रक्रिया नियमांनुसार पार पडावी, यासाठी हा पाठपुरावा असल्याचे वाघेरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन खरेदी दरांचे विश्लेषण व अधिकृत कागदपत्रांची पडताळणी करते का, याकडे लक्ष लागले आहे.
