३० हजारांचे जीवनावश्यक साहित्य, ५ हजारांची रोख मदत; आनंदवारी २०२६ ग्रुपचाही सहभाग
चिंचवड प्रतिनिधी : पितृपक्षातील अन्नदानाचे महत्त्व लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने श्रीक्षेत्र देहू येथील शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ५५ विद्यार्थ्यांसाठी अन्नदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे ३० हजार रुपये किमतीचे जीवनावश्यक साहित्य आणि ५ हजार रुपयांची रोख मदत संस्थेला देण्यात आली.
गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर, साबण आदी वस्तूंचा या साहित्यामध्ये समावेश होता. पितृपक्षातील अमावस्येच्या दिवशी संस्थेचे संस्थापक गणेश महाराज चंदेरे यांच्याकडे हे साहित्य व रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली.
या उपक्रमासाठी आनंदवारी २०२६ ग्रुपने विशेष योगदान दिले. आनंदवारी उपक्रमातून शिल्लक राहिलेली सुमारे १० हजार ५०० रुपयांची संपूर्ण रक्कम वारकरी विद्यार्थ्यांच्या अन्नदानासाठी देण्यात आली. तसेच कै. मारुती केसू वाल्हेकर आणि कै. बबाबाई मारुती वाल्हेकर यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
या वेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष रोटेरियन अमित औटी, माजी अध्यक्ष रोटेरियन गोविंद जगदाळे, माजी सचिव रोटेरियन वसंत ढवळे, रोटेरियन जयश्री भामरे, वसंत भांबरे सर आणि ह.भ.प. अर्जुन महाराज जाधव उपस्थित होते.
संस्थेतील विद्यार्थ्यांना भविष्यात शैक्षणिक मार्गदर्शन करण्याची तयारी ह.भ.प. गोविंद जगदाळे सर यांनी दर्शविली. तसेच संस्थेच्या बांधकामासाठी रोटरी क्लबच्या वतीने सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष अमित औटी यांनी केले.
धार्मिक परंपरेला सामाजिक सेवेची जोड देणाऱ्या या उपक्रमातून ५५ वारकरी विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळाला. रोटरी क्लबचे सदस्य, त्यांचे मित्र-नातेवाईक, आनंदवारी २०२६ ग्रुप आणि दात्यांच्या सहकार्यातून साकारलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
