यवतमाळातून आठ जणांना अटक; अपहृताची २४ तासांत सुखरूप सुटका
पिंपरी, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : उसतोडणीच्या उचलीच्या पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एका व्यक्तीचे मोटारसायकलीसह अपहरण करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने यवतमाळ जिल्ह्यातून अटक केली. अपहृत राजेश बाळू चव्हाण याची पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांत सुखरूप सुटका केली. या कारवाईत अपहरणासाठी वापरण्यात आलेली कार, तीन रिक्षा तसेच अपहृताची मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आंबेठाण येथील घाटेवस्ती परिसरातून तीन रिक्षांमधून आलेल्या काही जणांनी राजेश चव्हाण यांचे त्यांच्या मोटारसायकलीसह अपहरण केले. याप्रकरणी त्यांच्या पत्नी सुषमा राजेश चव्हाण (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना गंभीर स्वरूपाची असल्याने अपहृत व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान अमोल रामराव राठोड (वय २९), सचिन रामराव राठोड (वय २५) आणि निलेश संतोष राठोड (वय २७) या तिघांना शिक्रापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हा प्रकार संदीप गुलाब राठोड याच्या उसतोडणीच्या टोळीच्या उचलीच्या पैशांच्या व्यवहारातून झाल्याचे समोर आले. या प्रकरणात एकूण आठ जण सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्यानंतर तातडीने दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथे कारवाई करून उर्वरित आरोपींना ताब्यात घेतले. तसेच अपहृत राजेश चव्हाण यांची २४ तासांच्या आत सुखरूप सुटका केली.
१) अमोल रामराव राठोड (वय २९), रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ,२) सचिन रामराव राठोड (वय २५), रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ,३) निलेश संतोष राठोड (वय २७), रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ,४) शुभम प्रल्हाद जाधव (वय २५), रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ,५) संदीप गुलाब राठोड (वय ४२), रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ,६) इंदल थावरा जाधव (वय ४०), रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ,७) राजू बापुराव चव्हाण (वय ४४), रा. वरुड बेबी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ,८) संदीप उदयभान जाधव (वय ३२), रा. नाईकनगर तांडा, ता. हातगाव, जि. संभाजीनगर.या आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली हुंदाई व्हेन्यू कार, तीन ऑटो रिक्षा तसेच अपहृत व्यक्तीची शाईन मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-४ श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त महाळुंगे विभाग प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे तसेच उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.
