निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या प्रश्नांवर इंडिया आघाडी, सिव्हिल सोसायटी व पुरोगामी संघटनांचा एल्गार
पिंपरी प्रतिनिधी: भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे. मतदार याद्या, निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत नागरिकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘लोकशाही बचाव मार्च’ काढण्यात येणार आहे.
गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आकुर्डी गाव येथील विठ्ठल मंदिरापासून तहसीलदार कार्यालय, निगडीपर्यंत हा मार्च काढण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड इंडिया आघाडीतील घटक पक्षांसह सिव्हिल सोसायटी, पुरोगामी व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लोकशाहीप्रेमी नागरिक या मार्चमध्ये सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मतदार याद्यांमधील बदल, पात्र मतदारांच्या नावांबाबत उपस्थित होणारे प्रश्न तसेच विशेष पुनर्परीक्षण अभियान (SIR) यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. निवडणूक प्रक्रिया कोणत्याही राजकीय पक्षाच्या हितासाठी नसून ती स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणे आवश्यक असल्याचेही आयोजकांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोग ही भारतीय लोकशाहीतील महत्त्वाची संवैधानिक संस्था असल्याने आयोगाच्या निर्णयांबाबत नागरिकांचा विश्वास कायम राहणे आवश्यक आहे. आयोगाच्या कारभाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या मार्चच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
प्रमुख मागण्या….
💮पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
💮मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करून कायद्यानुसार कारवाई करावी.
💮मतदार यादी विशेष पुनर्परीक्षण अभियान (SIR) तात्काळ रद्द करावे.
💮निवडणूक आयोगाचे कामकाज पारदर्शक, निष्पक्ष आणि स्वतंत्र पद्धतीने पूर्ववत करावे.
💮मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या निर्णयांचे स्वतंत्र पुनर्परीक्षण करावे.
मार्चमध्ये शहरातील नागरिक, इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी, पुरोगामी संघटना आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मार्चचा तपशील :….
स्थळ : विठ्ठल मंदिर, आकुर्डी गाव ते तहसीलदार कार्यालय, निगडी
दिनांक : गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी ११ वाजता
आयोजक : पिंपरी-चिंचवड इंडिया आघाडी, सिव्हिल सोसायटी, पुरोगामी व सामाजिक संघटना.
