सरसंघचालक डॉ. मोहन भागवत : ऑल इंडिया विहार सेवा ग्रुपच्या १४ व्या परिषदेचे मुंबईत आयोजन
मुंबई, दि. २ ऑक्टोबर २०२६ : राष्ट्राचा उद्देश धर्म आहे आणि धर्मच राष्ट्राला टिकवून ठेवतो. धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून असून, एकाचे अस्तित्व असेल तरच दुसऱ्याचे अस्तित्व टिकू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
मुंबईतील बोरीवली येथे ऑल इंडिया विहार सेवा ग्रुपच्या १४ व्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी जैन तरुणांसह उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमास पद्मभूषण परमपूज्य आचार्य विजय रत्नसुंदरसूरि महाराज, आचार्य महाबोधी सूरीश्वरजी यांच्यासह विविध आचार्य आणि मान्यवर उपस्थित होते.
आज जग विविध विरोधाभास, संघर्ष आणि टोकाच्या विचारसरणींमुळे अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत मानवतेला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेत आहे. त्यामुळे जग भारताकडे आशेने पाहत आहे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
भारताने आपल्या ज्ञानाचा प्रसार अन्य देशांवर आक्रमण करून किंवा सक्तीने धर्मपरिवर्तन घडवून केलेला नाही. मानवकल्याणाच्या निःस्वार्थ भावनेतून भारताने आपले ज्ञान जगाला दिले आहे. हीच भारताच्या ज्ञानपरंपरेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांसह जैन आगम, त्रिपिटक आणि गुरुग्रंथ साहिब यांसारख्या ग्रंथांमध्ये मानवतेला दिशा देणारे व्यापक ज्ञान सामावलेले आहे. संतांच्या शिकवणीतूनही मानवकल्याण, समरसता आणि सेवाभावाचा संदेश मिळतो. या ज्ञानसंपदेची आज संपूर्ण जगाला आवश्यकता असल्याचे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.
भारताच्या ज्ञानपरंपरेचे संरक्षण करणे आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही केवळ धार्मिक जबाबदारी नसून संपूर्ण मानवतेप्रती असलेले कर्तव्य आहे. संतपरंपरा आणि सेवाभावी वृत्तीचे जतन म्हणजे मानवी समाजाच्या सुरक्षित व कल्याणकारी भविष्याचे जतन होय, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विहार सेवक आणि उपस्थितांना संबोधित करताना पद्मभूषण परमपूज्य आचार्य श्रीमद् विजय रत्नसुंदरसूरि महाराज म्हणाले की, देशाची संस्कृती संपली तर देश संपायला वेळ लागत नाही. त्यामुळे देशाची संस्कृती वाचवणे आणि तिचे जतन करणे आवश्यक आहे. हे केवळ संस्कारांमुळे शक्य होईल. राष्ट्र वाचले तर धर्म वाचेल आणि धर्म वाचला तर आपण सुरक्षित राहू. राष्ट्रसुरक्षा आणि संस्कृती रक्षणासाठी आम्ही संघासोबत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
पायी विहार करणाऱ्या जैन साधूंच्या सुरक्षेसाठी सेवा
ऑल इंडिया विहार सेवा ग्रुप देशभरात पायी विहार करणाऱ्या जैन साधूंचा प्रवास सुरक्षित आणि अपघातविरहित होण्यासाठी विविध प्रकारे मदत करतो. साधूंच्या सुरक्षित विहारासाठी जनजागृती आणि सेवाकार्याच्या माध्यमातून संस्थेचे कार्य सुरू आहे.
आचार्य विजय रत्नसुंदरसूरि महाराज यांच्या ५३६ व्या पुस्तकाचे प्रकाशन
पद्मभूषण परमपूज्य आचार्य श्रीमद् विजय रत्नसुंदरसूरि महाराज यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ‘आनंद यात्रा-अठराह कर्तव्य’ या ५३६ व्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
