६.६५ लाखांचे ४४ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त; बावधन पोलिसांची कारवाई
पिंपरी-चिंचवड, दि. २ ऑक्टोबर २०२६ : महिला पीजीमध्ये घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या प्लंबरला बावधन पोलिसांनी काळेवाडी फाटा परिसरातून ताब्यात घेतले. राकेश यशवंत दाते (वय ३३) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी बाबासाहेब पवार (वय ३२) यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पाषाण-सुस रोडवरील सुसगाव येथील स्टांजा लिव्हींग अवीव या महिला पीजीमध्ये त्या राहतात. दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ ते २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले मयुरी पवार व त्यांच्या मैत्रीण पूजा जाधव यांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची उकल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने पीजीमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषण सुरू केले. गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेत असताना चोरी करणारा इसम काळेवाडी फाटा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे यांच्या पथकाने काळेवाडी फाटा परिसरात कारवाई करून राकेश दाते याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, किंमत ६ लाख ६५ हजार रुपये, हस्तगत करण्यात आले.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त हिंजवडी विभाग विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) परवेज शिकलगार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, तसेच बापुसाहेब धुमाळ, फारुक मुल्ला, अतिश जाधव, अरुण नरळे, सुहास डंगारे, ऋषीकेश पाटील, दत्तात्रय शिंदे, अक्षय लाटे आदींचा सहभाग होता.
