१२ तासांत बावधन पोलिसांची कारवाई; १४ लाखांची होंडा एलीवेट कार जप्त
पिंपरी, दि. २ ऑक्टोबर २०२६ : शेअर बाजारातील झालेला तोटा भरून काढण्यासाठी मित्राची तब्बल १४ लाख रुपये किमतीची होंडा एलीवेट कार चोरी करून ती राजस्थानमध्ये विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तरुणाला बावधन पोलिसांनी पाठलाग करून शिरपूर (जि. धुळे) येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरीची कारही अवघ्या १२ तासांत हस्तगत केली.
याप्रकरणी प्रथम सोमेश्वरदास गुप्ता (रा. बावधन, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना बावधन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्याचा माग काढला. चोरीची कार घेऊन आरोपी प्रथम वाघोली, त्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, चाळीसगावमार्गे धुळ्याकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याचा पाठलाग सुरू केला.
शिरपूर, जिल्हा धुळे येथे पोलिसांनी कार अडवून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचे नाव रोहन सत्यनारायण सोमानी (वय २६, रा. रविनंदा स्कायलाईट सोसायटी, स्टार बाजारमागे, वाघोली, पुणे; मूळ रा. भिलवाडा, राजस्थान) असे आहे.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने शेअर बाजारात नुकसान झाल्याचे सांगितले. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने वडील व इतरांकडून पैसे उसने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी मित्र प्रथम गुप्ता यांची कार चोरी करून ती राजस्थानमध्ये नेऊन विकण्याचा त्याचा कथित बेत होता.
बावधन पोलिसांनी आरोपीस चोरीच्या कारसह १२ तासांच्या आत ताब्यात घेत गुन्ह्याचा छडा लावला. पुढील तपास पोलीस हवालदार फारुक मुल्ला करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) परवेज शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.
