सहा-सात महिन्यांपासून देयके प्रलंबित; तातडीने मजुरी जमा करण्याची मागणी
वैजापूर (प्रतिनिधी) : विजयकुमार मोकळे……वैजापूर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास योजनेतील शेकडो घरकुल लाभार्थ्यांची रोजगार हमी योजनेंतर्गत मिळणारी अकुशल कामाची मजुरी गेल्या सहा-सात महिन्यांपासून रखडली आहे. मे २०२६ पासून अनेक लाभार्थ्यांच्या अकुशल मजुरीचे मस्टर ऑनलाइन झाले असून, चार-चार मस्टर निघूनही संबंधितांच्या बँक खात्यावर अद्याप मजुरीची रक्कम जमा झालेली नसल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
घरकुल लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत अकुशल कामाच्या मजुरीपोटी सुमारे २८ ते ३० हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळते. मात्र, वैजापूर तालुक्यात रमाई आवास योजनेतील सुमारे ५७७ घरकुले तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील अनेक लाभार्थी प्रलंबित मजुरीच्या देयकांमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
व्हीबीजी-रामजी योजना लागू झाल्यानंतरच्या काही लाभार्थ्यांची मजुरीची देयके खात्यावर जमा होत असताना, त्यापूर्वी मे २०२६ पासून प्रलंबित असलेल्या अनेक लाभार्थ्यांची देयके अद्याप मिळालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय मोकळे करंजगावकर यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. जायेभाये यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे प्रलंबित मजुरीचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
आधीच घरकुलासाठी मिळणाऱ्या निधीत घराचे बांधकाम पूर्ण करणे गरीब लाभार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. त्यात दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत घरकुलासाठी मिळणारी रोजगार हमीची सुमारे ३० हजार रुपयांची मजुरी अनेक महिन्यांपासून रखडल्याने लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
याबाबत गटविकास अधिकारी श्री. जायेभाये यांनी काही देयके तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असल्याचे सांगितले. संबंधित तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर प्रलंबित देयके लवकरच अदा करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, दुष्काळी परिस्थितीत गरीब घरकुल लाभार्थ्यांची हजारो रुपयांची मजुरी सहा-सात महिन्यांपासून प्रलंबित राहणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या संबंधित विभागाने तातडीने तांत्रिक अडचण दूर करून मे २०२६ पासून प्रलंबित असलेली सर्व अकुशल मजुरीची देयके लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावीत, अशी मागणी विजय मोकळे करंजगावकर यांनी केली आहे.
मजुरी जमा न झाल्यास आंदोलनाचा इशारा….
घरकुल लाभार्थ्यांची अकुशल कामाची प्रलंबित मजुरीची देयके तातडीने खात्यावर जमा न केल्यास पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय मोकळे करंजगावकर यांनी दिला आहे. गरीब व गरजू घरकुल लाभार्थ्यांच्या हक्काची मजुरी वेळेत मिळणे आवश्यक असून, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
