हिंजवडी पोलिसांच्या शास्त्रोक्त तपास व प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्याला यश
पिंपरी : व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या भावाला बहिणीने विरोध केल्याने संतप्त झालेल्या भावाने तिचा गळा दाबून खून केल्याच्या १६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हिंजवडी पोलिसांनी केलेल्या शास्त्रोक्त तपासासह सरकारी अभियोक्त्यांचा प्रभावी युक्तिवाद आणि सातत्यपूर्ण न्यायालयीन पाठपुराव्यामुळे या प्रकरणात दोषसिद्धी झाली.
दिनांक १४ एप्रिल २०१० रोजी पहाटे ४.२५ वाजण्यापूर्वी अपराजिता सोसायटी, शिंदेनगर, पुणे येथे ही घटना घडली होती. आरोपी सुबोजित बासू हा व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे निराश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी त्याची बहीण प्रियदर्शिनी बासू (वय २३) हिने त्यास विरोध केला. त्यानंतर आरोपीने तिचा गळा दाबून तिची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ए.एस. वंजारी यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली. तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर.टी. पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर उपलब्ध पुरावे शास्त्रोक्त पद्धतीने संकलित करून आरोपीविरुद्ध भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार या गुन्ह्याची ‘स्टार केस’ म्हणून निवड करण्यात आली. गुन्हे आढावा बैठकीत पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-२ प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त, हिंजवडी विभाग विठ्ठल कबडे यांनी प्रकरणाचा वेळोवेळी आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले. त्यानंतर ही ‘स्टार केस’ ‘दत्तक केस’ म्हणून हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे सोपविण्यात आली.
सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता श्रीमती लिना पाठक यांनी सरकारतर्फे भक्कमपणे बाजू मांडली. साक्षीदारांनी न्यायालयात अचूक व योग्य साक्ष देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिद्धराम म्हेत्रे यांनी आवश्यक मार्गदर्शन केले.
न्यायालयीन कामकाजासाठी सफौ नितीन साळुंखे, पोलीस हवालदार नितीन पवार (ब.नं. १४९५), पोलीस हवालदार आबा सावंत (ब.नं. ८२१), मपोशि किती घार्गे (मुद्देमाल कारकून) आणि मपोशि फडतारे यांनी काम पाहिले.
साक्षीदारांना वेळेत न्यायालयात हजर ठेवणे, सरकारी अभियोक्त्यांशी समन्वय साधणे, सी.ए. अहवाल वेळेत प्राप्त करून घेणे, मुद्देमाल न्यायालयात सादर करणे तसेच न्यायालयीन कामकाजाचा सातत्याने पाठपुरावा करणे या जबाबदाऱ्या संबंधित अधिकारी व अंमलदारांनी प्रभावीपणे पार पाडल्या.
उपलब्ध पुरावे व साक्षीदारांची साक्ष विचारात घेऊन मा. न्यायालयाने आरोपी सुबोजित बासू यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास अशीही शिक्षा सुनावण्यात आली.
तब्बल १६ वर्षांपूर्वी घडलेल्या या खूनप्रकरणात हिंजवडी पोलिसांनी केलेला शास्त्रोक्त तपास, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सरकारी अभियोक्त्यांशी प्रभावी समन्वय आणि सातत्यपूर्ण न्यायालयीन पाठपुरावा यामुळे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. ‘स्टार केस’च्या माध्यमातून तपास यंत्रणेच्या समन्वित प्रयत्नांना न्यायालयीन निकालाच्या रूपाने यश मिळाले आहे.
