भारतीय जैन संघटनेच्या शाळेत चित्रकला उपक्रम; पंतप्रधान नरेंद्र मोदी व कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पिंपरी, दि. २६ सप्टेंबर २०२६ (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात आलेल्या ‘स्वप्नातला भारत’ या संकल्पनेवर आधारित विशेष चित्रकला उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, संत तुकाराम नगर यांच्या वतीने भारतीय जैन संघटनेच्या शाळेत करण्यात आले. कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतील विकसित, सक्षम आणि प्रगत भारत चित्रांच्या माध्यमातून साकारला. विविध चित्रांमधून आधुनिक भारत, विज्ञान-तंत्रज्ञान, स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण संवर्धन तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने विद्यार्थ्यांनी मांडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू-चिवडा व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य देशमुख सर, उपप्राचार्य जाधव सर, यादव सर, भाजप कोअर कमिटीचे सदस्य सदाशिवराव खाडे, माजी नगरसेवक तथा भाजप महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुजाताताई पालांडे, तसेच मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर, अभय फाळके, राहुल खाडे, अमोल घोरपडे, दीपक पाटील, दिनेश पाटील, जयदेव अक्कलकोटे, तात्याराव गायकवाड, राहुल शितोळे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “उद्याचा भारत म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात. भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने मोठे ध्येय ठेवले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी विविध क्षेत्रांत काम केले आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही भविष्यात मोठे होऊन देशाची मान जगात उंच करा.”
विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा देत त्यांनी अभ्यासासोबतच मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. सदाशिवराव खाडे, सुजाताताई पालांडे आणि प्राचार्य देशमुख सर यांनी यशवंतभाऊ भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांच्या चित्रकला उपक्रमाचे कौतुक केले.
‘स्वप्नातला भारत’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देतानाच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या पिढीमध्ये सकारात्मक विचार, मोठी स्वप्ने आणि राष्ट्रनिर्मितीची भावना रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
