अग्निशमन यंत्रणेचे सेफ्टी ऑडिट करा; ५० ते ९० मीटरच्या हायड्रोलिक शिड्या तातडीने खरेदी करा : शत्रुघ्न काटे
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील ‘गणेशम फेज-२’ सोसायटीत १८ सप्टेंबर २०२६ रोजी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेच्या सज्जतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा स्थानिक लोकप्रतिनिधी शत्रुघ्न (बापू) काटे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
शहरात मोठ्या संख्येने उंच इमारती उभ्या राहत असताना त्यांच्यासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक बचाव यंत्रणा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे ५० ते ९० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीपर्यंत पोहोचू शकणाऱ्या अत्याधुनिक हायड्रोलिक शिड्या व एरियल प्लॅटफॉर्म्स अग्निशमन ताफ्यात तातडीने समाविष्ट करावेत, अशी मागणी काटे यांनी केली आहे.
‘गणेशम फेज-२’मधील आगीच्या घटनेत बंद फ्लॅटमध्ये दोन लहान मुली अडकल्या होत्या. बचावकार्यादरम्यान उपलब्ध साधनसामग्री, उपकरणे आणि नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित झाल्याचे काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे. उंच इमारतींमधील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने आपली अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपच्या प्रमुख मागण्या…..
हायड्रोलिक शिड्यांची तातडीने खरेदी : ५० ते ९० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीपर्यंत पोहोचणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानकांच्या हायड्रोलिक शिड्या व एरियल प्लॅटफॉर्म्स अग्निशमन ताफ्यात समाविष्ट करावेत.
फायर ऑडिटचा अहवाल जाहीर करा : शहरातील किती सोसायट्यांचे फायर ऑडिट पूर्ण झाले, किती ठिकाणी त्रुटी आढळल्या आणि किती सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, याची माहिती असलेला सविस्तर अहवाल महापालिकेने सार्वजनिक करावा. हा अहवाल सात दिवसांत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अग्निशमन यंत्रणेचे सेफ्टी ऑडिट : अग्निशमन दलातील वाहने, पंप, ऑक्सिजन मास्क तसेच विविध बचाव उपकरणांची तातडीने तपासणी करून नादुरुस्त व कालबाह्य साहित्य बदलावे आणि आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी.
प्रशिक्षण व मॉकड्रिल : उंच इमारतींमधील आग व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन जवानांना विशेष प्रशिक्षण द्यावे. तसेच शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नियमित मॉकड्रिल आयोजित कराव्यात.
“पिंपरी-चिंचवडकर नागरिकांचा आणि त्यांच्या लहान मुलांचा जीव अत्यंत मोलाचा आहे. केवळ इमारतींना मंजुरी देणे आणि करवसुली करणे एवढ्यापुरती महापालिकेची जबाबदारी मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम यंत्रणा उभारणेही आवश्यक आहे. ‘गणेशम फेज-२’मधील घटना ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. या मागण्यांवर येत्या ८ ते १० दिवसांत ठोस पावले उचलावीत,” अशी मागणी शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केली.
– शत्रुघ्न (बापू) काटे,शहराध्यक्ष, भाजप पिंपरी-चिंचवड शहर
