गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण; दोन मंडळांवर गुन्हे
पुणे / शिरगाव.…..: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलिसांनी दोन गणेश मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत आठ डीजे साऊंड सिस्टीम स्पीकर, दोन डीजे मिक्सर, दोन अॅम्प्लीफायर मशीन आणि एक वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सह पोलीस आयुक्तांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १ वाजल्यापासून २६ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत सार्वजनिक ठिकाणी उच्च आवाज क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम तसेच ध्वनीप्रदूषण करणारी साधने वापरण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शिरगाव-परंदवडी पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच डीजे चालक व मालकांची बैठक घेऊन ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांची माहिती दिली होती. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळे तसेच डीजे चालक-मालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा लेखी सूचना देण्यात आल्या होत्या.
२० सप्टेंबर रोजी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाणे हद्दीत सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी एकूण ३८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका होत्या. या मिरवणुकांदरम्यान चांदखेड येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि ओझर्डे येथील शिवतेज मित्र मंडळ यांनी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी दोन्ही मंडळांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७०, २९३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांनुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान डीजे साऊंड सिस्टीम, मिक्सर, अॅम्प्लीफायर आणि वाहन असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-४) श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त, देहूरोड विभाग प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्यासह अशोक केंद्रे, महेंद्र सपकाळ, दिनकर भुजबळ, प्रशांत भोसले, दत्तप्रसाद चौधरी, रितेश कोळी, काजल आघाव, सुरेश परदेशी, संतोष तांबे, सागर कोळी आणि लक्ष्मण हेमाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
डि.जे न वाजविण्याचे पोलिसांचे आवाडीजेहन
गणेशोत्सवाच्या उर्वरित कालावधीत तसेच विसर्जन मिरवणुकांदरम्यान गणेश मंडळांनी उच्च आवाज क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम किंवा ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साधनांचा वापर करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून संबंधित ध्वनीक्षेपक यंत्रणा जप्त केली जाऊ शकते. या कारवाईस संबंधित मंडळांचे पदाधिकारी व आयोजक जबाबदार राहतील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
