ताथवडे रोडवरील ४०×३० फुटांचा फलक लोखंडी स्ट्रक्चरसह निष्कासित; जाहिरात एजन्सींना महापालिकेचा इशारा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत परवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांची स्थळ पाहणी करून ते निष्कासित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम २४४ व २४५ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्ह व स्कायसाईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम, २०२२ मधील तरतुदींनुसार खासगी जागेतही जाहिरात फलक उभारण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी आवश्यक परवानगी न घेता जाहिरात फलक उभारले जात असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
शहराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासोबतच अनधिकृत जाहिरात फलकांमुळे होणारे विद्रूपीकरण आणि महापालिकेच्या संभाव्य जाहिरात महसुलावर होणारा परिणाम टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी ताथवडे येथील अनधिकृत जाहिरात फलक, थरमॅक्स चौकातील समर्थ सहकारी बँकेच्या इमारतीवरील जाहिरात फलक तसेच सर्व्हे नं. १७५/९, काळेभोर रोड, चोवीसावाडी येथील अनधिकृत जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले आहेत.
दरम्यान, ताथवडे रोड, विष्णूदेव नगर, पुनावळे येथे सुमारे ४० × ३० फूट आकाराचा जाहिरात फलक परवानगीशिवाय उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले. आकाशचिन्ह व परवाना विभागाने उपआयुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित फलकावर कारवाई केली. या कारवाईत लोखंडी स्ट्रक्चरसह संपूर्ण जाहिरात फलक निष्कासित करण्यात आला.
महापालिका हद्दीतील सर्व जाहिरात एजन्सींनी जाहिरात फलक उभारण्यापूर्वी आवश्यक ती महापालिका परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापुढे परवानगीशिवाय जाहिरात फलक उभारल्याचे आढळल्यास संबंधित फलक महापालिकेकडून तातडीने निष्कासित करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
