खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई; पाच महिन्यांपासून पोलिसांना देत होता चकवा
पिंपरी चिंचवड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेने मोका (MCOCA) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात मागील पाच महिन्यांपासून पाहिजे असलेल्या आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून ५३ हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्टल, दोन मॅग्झिन्स आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल रमेश चव्हाण (वय २६, रा. भारतमातानगर, दिघी, पुणे) याच्याकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार प्रदीप पोटे यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.
पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पतारे मळा, ९० फुटी रोड, म्हसोबा देवस्थानासमोरील मोकळी जागा, चऱ्होली बु., ता. हवेली येथे सापळा रचून राहूल चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी पिस्टल, दोन लोखंडी मॅग्झिन्स आणि दोन जिवंत काडतुसे, असा एकूण ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, राहूल चव्हाण हा दिघी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. २१५/२०२६ मधील गंभीर गुन्ह्यात मागील पाच महिन्यांपासून पाहिजे आरोपी होता. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत. आरोपी पोलिसांना चकवा देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, पोलीस हवालदार प्रदीप पोटे, किरण जाधव, चंद्रकांत जाधव आणि पोलीस शिपाई संदीप गंगावणे यांच्या पथकाने केली.
