नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
पिंपरी प्रतिनिधी : शहरातील गणेशम फेज २ सोसायटीमध्ये अचानक आग लागल्याची थरारक घटना शुक्रवारी घडली. आगीची माहिती मिळताच नगरसेवक श्री. शत्रुघ्न काटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या एका खोलीत दोन चिमुरड्या अडकल्या असल्याचे समोर आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून दोन्ही मुलींची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. खोलीत दोन लहान मुले अडकल्याचे समजताच जवानांनी कोणतीही पर्वा न करता धाडसाने बचावकार्य हाती घेतले आणि दोन्ही चिमुरड्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
यावेळी नगरसेविका सौ. अनिताताई काटे आणि नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे यांच्यासह परिसरातील नागरिकही घटनास्थळी उपस्थित होते.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दाखवलेली तत्परता, तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेले धाडसी व वेगवान बचावकार्य यामुळे दोन चिमुरड्यांचे प्राण वाचले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.
