बनावट आधारकार्डचा वापर; देहूरोड पोलिसांच्या ताब्यात, बांगलादेशात हद्दपारीची प्रक्रिया सुरू
पिंपरी, दि. १८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दहशतवाद विरोधी शाखेने (ATB) देहूरोड परिसरातील एका लॉजवर कारवाई करत भारतात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले. संबंधित महिलेने बनावट आधारकार्डच्या आधारे पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे भासविल्याचे पोलिसांच्या पडताळणीत निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ सप्टेंबर रोजी ATB पथकाला देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वर्ग लॉज येथे एक बांगलादेशी महिला अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली असता तन्हा खातून नावाची महिला आढळून आली.
पडताळणीदरम्यान तिच्याकडील आधारकार्ड बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता तिचे बांगलादेशातील नाव फिहा मो. मुजिबुर रहमान (वय १९) असून ती बांगलादेशातील जमालपूर परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले. सुमारे वर्षभरापूर्वी बांगलादेशातून भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याची माहिती तिने पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच, ती मोबाईलमधील IMO आणि WhatsApp या माध्यमातून बांगलादेशातील आई-वडील तसेच अन्य नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
संबंधित महिलेला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी देहूरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, परकीय नागरिक नोंदणी शाखेच्या माध्यमातून तिला बांगलादेशात हद्दपार करण्याची प्रक्रिया विशेष शाखेमार्फत सुरू करण्यात आली आहे.
२९ बांगलादेशी नागरिकांचा शोध; २६ जणांना हद्दपार
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माहितीनुसार, गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या दि. २ मे २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर नियमानुसार हद्दपारीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
दि. २ मे २०२५ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ATBने अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या एकूण २९ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यापैकी २६ नागरिकांना बांगलादेशात हद्दपार करण्यात आले असून, तीन नागरिकांबाबत हद्दपारीची कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली तसेच विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने केली.
