पुणे कॅम्ब्रिज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये “संविधान दिन” उत्साहात साजरा
पुणे प्रतिनिधी: पुणे कॅम्ब्रिज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाने देशाला दिलेली लोकशाही मूल्ये, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या कै. तुकाराम धोंडिबा कुंजीर लॉ कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वरिष्ठ महाविद्यालय तसेच व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक व वक्त्या म्हणून अॅड शर्वरी सडोलीकर उपस्थित होत्या. त्यांनी ‘Constitutional Values: The Foundation of Justice and the Responsibility of Future Lawyers’ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, त्यामागील विचारधारा, संविधानातील मूलभूत तत्त्वे आणि लोकशाही व्यवस्थेमधील नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला.
भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे संकलन नसून देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेने जगण्याचा अधिकार देणारा आणि न्यायपूर्ण समाजव्यवस्थेचा पाया मजबूत करणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, असे त्यांनी नमूद केले न्यायव्यवस्थेमध्ये संविधानिक मूल्यांचे स्थान अनन्यसाधारण असून भावी वकील म्हणून विद्यार्थ्यांनी न्याय, निष्पक्षता, समानता आणि सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विशेषतः कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संविधानातील तरतुदींचा केवळ अभ्यास न करता त्या प्रत्यक्ष जीवनात आणि न्यायदानाच्या प्रक्रियेत कशा प्रकारे उपयोगी पडतात, हे समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिले असले, तरी त्या अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भावी पिढीने संविधानिक मूल्यांचे जतन करून देशाच्या लोकशाही व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. टी. कुंजीर, सचिव मयूर कुंजीर, खजिनदार छाया कुंजीर, व्यवस्थापकीय संचालक गौरव कुंजीर आणि प्रीतम कुंजीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. संस्थेच्या विविध शैक्षणिक विभागांतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून संविधान दिनाचे महत्त्व जाणून घेतले
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. मनोहर कराडे आणि डॉ. तुषार दगडे यांच्या हस्ते संविधान वाचनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून भारतीय संविधानातील मूल्यांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. संविधानाच्या उद्देशिकेतील प्रत्येक शब्द हा भारतीय लोकशाहीचा आत्मा असून त्याचे आचरण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती सावंत यांनी प्रभावीपणे केले. प्रमुख वक्त्या अॅड. शर्वरी सडोलीकर यांचा परिचय प्रा. सारिका इंगळकर यांनी विद्यार्थ्यांना करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी के. तुकाराम धोंडिबा कुंजीर लॉ कॉलेजच्या विभागप्रमुख प्रा.अनघा कदम यांनी उपस्थित मान्यवर, प्रमुख वक्त्या, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी यांचे आभार मानले.
भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. केवळ संविधानाचा अभ्यास न करता संविधानाने दिलेली मूल्ये आपल्या आचरणात आणणे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य संदेश ठरला. अशा शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासोबतच त्यांना जागरूक, जबाबदार आणि संविधाननिष्ठ नागरिक बनविण्याच्या दृष्टीने पुणे कॅम्ब्रिज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
