कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना पोलिसांचा कडक इशारा
पिंपरी-चिंचवड : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली असून, आयुक्तालय हद्दीतील तब्बल ५३ सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हेगारी वृत्तीच्या इसमांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५५ व ५६ अन्वये सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस सहआयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड तसेच अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) श्री. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
परिमंडळनिहाय तडीपार कारवाई
💮परिमंडळ-१ : १३ गुन्हेगार
💮परिमंडळ-२ : ११ गुन्हेगार
💮परिमंडळ-३ : १९ गुन्हेगार
💮परिमंडळ-४ : १० गुन्हेगार
💮एकूण : ५३ गुन्हेगार
या ५३ सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीसह पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात गोंधळ घालणाऱ्यांची गय नाही!
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा, नागरिकांच्या शांततेला बाधा आणण्याचा किंवा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ, कठोर आणि प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिला आहे.
सराईत गुन्हेगार, समाजविघातक प्रवृत्तीचे इसम आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम आगामी काळातही सातत्याने आणि कठोरपणे सुरू राहणार आहे.
