निगडी बसथांब्याजवळ अपघात; प्रवाशांना किरकोळ दुखापत, वाहतूक कोंडी
पिंपरी-चिंचवड / निगडी प्रतिनिधी: मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी बसथांब्याजवळ रविवारी रात्री पीएमपीएमएलच्या बसचा अपघात झाल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या लोखंडी पत्र्यांच्या कंपाऊंडमध्ये बस घुसल्याने हा अपघात झाला.
या अपघातात बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. बसचालकाने मद्यप्राशन करून वाहन चालविले असल्याचा आरोप करण्यात आला असून, या गंभीर प्रकाराची चौकशी करून दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक वाहतूक बस चालविणे हा प्रवाशांच्या तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताशी खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने चालकाची वैद्यकीय तपासणी करून अहवालाच्या आधारे तातडीने कारवाई करावी, तसेच सार्वजनिक वाहतूक वाहनांच्या चालकांची नियमित तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या घटनेची सखोल चौकशी करून अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
