आयशर टेम्पोतून तब्बल ७९.४६ लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
पुणे/शिरगाव : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आंतरराज्यीय गुटखा तस्करीच्या टोळीविरोधात शिरगाव परंदवडी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून पोलिसांनी आयशर टेम्पो अडवून त्याची झडती घेतली असता तब्बल ७९ लाख ४६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री व वाहतूक होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.२० वाजता पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने मुंबईकडे जाणाऱ्या आयशर वाहनातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी स्वतः पोलीस पथकासह महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली.
दरम्यान, नवीन उर्से टोलनाक्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा लाल रंगाचा आयशर टेम्पो क्रमांक केए ५२ सी ६७५६ पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी तातडीने वाहन थांबवून चालकाकडे वाहनातील मालाबाबत चौकशी केली. चालकाने वाहनात व्हर्मी कम्पोस्ट खत असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये मोठमोठे बॉक्स आढळून आले. हे बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला रजनीगंधा गुटखा व तुलसी सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आली. त्याचबरोबर काही गोण्या व्हर्मी कम्पोस्ट खताच्या असल्याचेही आढळले.
पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून रजनीगंधा गुटखा — ₹ ४२,४३,२००,सुगंधी तुलसी तंबाखू — ₹ १४,४०,०००,व्हर्मी कम्पोस्ट खत — ₹ २,६३,१२०,आयशर कंपनीचा टेम्पो — ₹२०,००,००० असा एकूण ₹ ७९,४६,३२० किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, १२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात टेम्पो चालक अमजदउद्दीन ऐनुलहक चौधरी, रा. माखली, बंगळुरू, कर्नाटक, मूळ रा. त्रिपुरा, याला अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दि. १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आंतरराज्यीय गुटखा तस्करी प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) श्री. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ श्रीमती श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग श्री. प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळ, अशोक केंद्रे, प्रकाश पारखे, पोलीस हवालदार अमोल गोरे, किशोर गिरीगोसावी, सचिन काचोळे तसेच पोलीस अंमलदार सुरेश परदेशी, प्रसाद जंगीलवाड, दिलीप राठोड, शिवानंद चव्हाण, सागर कोळी, शुभम राजगुरे आणि रामेश्वर जाधवर यांच्या पथकाने सहभाग घेतला.
गुटखा तस्करीविरोधात शिरगाव परंदवडी पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
