सहा आरोपी जेरबंद; तळेगाव एमआयडीसी, चिखली व देहूरोड परिसरातील कॉपर चोरीच्या घटनांचा पर्दाफाश
पिंपरी, दि. १३ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-४ ने कॉपर चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल ₹१९ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, एकूण ९ गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कॉपर, वाहने आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले व पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक राजाराम लोणकर आणि पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांना गुप्त माहिती प्राप्त झाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी जयराम विक्रम साळंके (२९), सुरज जालिंदर फड (२१), सचिन जालिंदर फड (२६), महोम्मद रियाज मोहम्मद बशीर सलमानी, मनोज संतोषी चौधरी आणि अनजकुमार रामक्रीपाल गौतम या सहा जणांना संशयित कॉपर मुद्देमालासह ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ₹१८ लाख ७४ हजार किमतीचे कॉपर, चारचाकी वाहन आणि आयसर वाहन जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपींनी तळेगाव एमआयडीसी व चिखली परिसरातील विविध ठिकाणांवरील डी.पी.मधील कॉपर वायर व केबल चोरी करून त्यातील तारा काढल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहा आणि चिखली पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले. तसेच देहूरोड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३०२/२०२६ चा समांतर तपास करताना पोलिसांनी अजय प्रल्हाद गायकवाड (वय ५०, रा. माधवनगर, चिखली) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून केबल वायर, दोन ग्राइंडर मशीन, दोन रेग्युलेटर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा ₹१ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईमुळे तळेगाव एमआयडीसी, चिखली आणि देहूरोड पोलीस ठाण्यांतील एकूण ९ कॉपर चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, औद्योगिक भागात सुरू असलेल्या कॉपर चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक लोणकर, वायभसे तसेच गुन्हे शाखा युनिट-४ व तांत्रिक विश्लेषण शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.
