आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३५व्या शासकीय जयंतीनिमित्त भव्य सोहळा; मान्यवरांची उपस्थिती
भिवडी : आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मगावी भिवडी येथे त्यांच्या २३५व्या शासकीय जयंतीनिमित्त भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उमाजी नाईक यांच्या शौर्य, त्याग आणि क्रांतिकारी विचारांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव, युवक, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
“आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे केवळ नाव नसून धगधगता, जाज्वल्य आणि प्रेरणादायी विचार आहे,” या भावनेतून उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
या कार्यक्रमास रामोशी-बेरड-बेडर-वाल्मिकी समाजाचे जगद्गुरू प्रसन्नानंदपुरी महास्वामीजी, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार रामराव वडकुते, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, दलित महासंघाचे संस्थापक मच्छिंद्र सकटे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, ओबीसी सेवा संघाचे नानासाहेब टेंगळे, शामाकांतजी भिंताडे, अहिल्यादेवी धर्मपीठाचे संस्थापक सागर धापटे, भाजप ओबीसी महिला प्रदेशाध्यक्ष उज्वलाताई हाके, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पंकज भिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
शंकरराव गोफणे यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
या सोहळ्यात आदर्श शिक्षक तसेच जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हाध्यक्ष शंकरराव गोफणे सर यांना मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे तसेच अन्य मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजासाठी आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शंकरराव गोफणे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक योगदानाचा गौरव करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल उपस्थितांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमास जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अंकुशराव जाधव सर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बहुजन समाजबांधव, युवक, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमाजी नाईक यांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर करत सामाजिक एकजूट, स्वाभिमान आणि समाजहिताचा संदेश देत हा जयंती सोहळा उत्साहात पार पडला.
