विधी क्षेत्रातील अनुभवाची दखल; विविध न्यायालयीन प्रकरणांत महापालिकेचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅड. राजेश राजपुरोहित यांची महानगरपालिकेच्या वकील पॅनेलवर नियुक्ती केली आहे. महापालिकेचे प्रमुख विधी सल्लागार अॅड. राजेश आगळे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीचे अधिकृत पत्र त्यांना प्रदान करण्यात आले.
अॅड. राजेश राजपुरोहित यांनी आपल्या प्रदीर्घ वकिली व्यवसायात विविध स्वरूपाची अनेक महत्त्वपूर्ण तसेच हाय-प्रोफाइल प्रकरणे हाताळली आहेत. कायदेविषयक सखोल ज्ञान, न्यायालयीन कामकाजातील अनुभव आणि विविध प्रकरणांमध्ये प्रभावीपणे बाजू मांडण्याच्या कौशल्यामुळे त्यांनी विधी क्षेत्रात स्वतंत्र व विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.
विधी क्षेत्रासोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही अॅड. राजपुरोहित यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा (लीगल सेल), पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, या माध्यमातून कायदेविषयक क्षेत्रात योगदान दिले आहे.
महापालिकेच्या वकील पॅनेलवरील ही नियुक्ती त्यांच्या कायदेविषयक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. नियुक्तीच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेशी संबंधित विविध कायदेशीर व न्यायालयीन प्रकरणांमध्ये महापालिकेची बाजू प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे महापालिकेच्या कायदेशीर बाबींना अनुभवी विधिज्ञाची साथ मिळणार असून, विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये सक्षमपणे बाजू मांडण्यास मदत होणार आहे.
अॅड. राजेश राजपुरोहित यांच्या नियुक्तीबद्दल विधी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
