वाई येथे ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा; राज्यभरातील ६० मान्यवरांचा गौरव
सातारा/वाई, दि. ७ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराचे सुप्रसिद्ध पैलवान काळुराम लांडगे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय व दीर्घकालीन कार्याची दखल घेत ‘ग्लोबल स्टार पुरस्कार २०२६’ अंतर्गत राज्यस्तरीय ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्लोबल फाऊंडेशन, पुणे यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील वाई येथील रमेश गरवारे सभागृह, लोकमान्य टिळक ग्रंथालय येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या मान्यवर पुरस्कारार्थींमध्ये पैलवान काळुराम लांडगे यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी विशेष गौरविण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले अतुलनीय कार्य, दीर्घकाळाची समर्पित सेवा, गरजू व वंचित घटकांना निःस्वार्थपणे दिलेले सहकार्य आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरलेली कार्याची वाटचाल याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सिनेअभिनेते अतुल कुडले, सुप्रसिद्ध अभिनेते, पटकथा व संवाद लेखक, दिग्दर्शक, निर्माता तथा सामाजिक कार्यकर्ते तेजपाल वाघ, आनंदी जीवन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोशीन पठाण आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संचालक सत्यजित माने देशमुख यांच्या हस्ते पैलवान काळुराम लांडगे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय भाषणातून अभिनेते तेजपाल वाघ यांनी समाजसेवकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाच्या विकासाची खरी ताकद केवळ मोठ्या योजनांमध्ये नसून त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या माणसांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. गरजू, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण, संस्कार व आधार निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे योगदान निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला ग्लोबल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती जाधव यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी राज्यभरातून आलेल्या एकूण ६० पुरस्कारार्थींचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यास पुरस्कारार्थी, त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत कोचळे आणि त्यांच्या टीमने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्लोबल फाऊंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
