पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचा ३४ वा टप्पा; १४ शाळांमधील २,२८० विद्यार्थ्यांचे प्रबोधन
पिंपरी-चिंचवड : विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन, अपघात प्रतिबंध, अंमली पदार्थ व व्यसनाधीनतेपासून दूर राहणे, सायबर गुन्हेगारी तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी हा उपक्रम राबविण्यात येतो. वाहतूक शाखेच्या १४ पथकांमार्फत एकाच दिवशी १४ शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाते.
दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी या उपक्रमाचा ३४ वा टप्पा पार पडला. यावेळी वाहतूक शाखेच्या १० अधिकारी व १८ अंमलदारांच्या माध्यमातून १४ शाळांमधील सुमारे २,२८० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून पीपीटीद्वारे मुद्देसूद मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाच्या आतापर्यंतच्या ३४ टप्प्यांमध्ये तब्बल ५४४ शाळांमधील १ लाख १९ हजार ४७१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करणारा जबाबदार नागरिक तसेच समाजासाठी संवेदनशील आणि चांगला माणूस बनावे, या उद्देशाने हा विद्यार्थीभिमुख उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करीत आहेत.
दरम्यान, ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमाचा पुढील टप्पा गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.