प्रवेशिका सादर करण्याची मुदत ७ सप्टेंबरपर्यंत वाढविली
पिंपरी चिंचवड, दि. १ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या अंमली पदार्थविरोधी जनजागृतीच्या Reel, Poster व Short Video Competition ला शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या संख्येने प्रवेशिका प्राप्त होत असल्याने स्पर्धेची अंतिम मुदत ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
मागील महिन्यात आयोजित Virtual Townhall on Anti-Drug Awareness कार्यक्रमात युवक व विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविरोधात जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
अशी आहे स्पर्धेची संकल्पना
विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृतीपर Poster, Instagram Reel किंवा Short Video तयार करून Instagram वर पोस्ट करावे आणि @pcpcitypolice या अधिकृत हँडलला टॅग करावे. एका विद्यार्थ्याला एकापेक्षा अधिक Short Video किंवा Instagram Reels तयार करता येणार आहेत.
स्पर्धेसाठी दोन प्रमुख विषय देण्यात आले आहेत. त्यामध्ये ‘Speak Up, Report Confidentially’ या विषयाला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या Anti-Narcotics Helpline 7798100112 वर अंमली पदार्थांबाबतची माहिती गोपनीयपणे कशी देता येईल, याबाबत जनजागृती करणाऱ्या प्रवेशिकांना महत्त्व दिले जाणार आहे. याशिवाय अंमली पदार्थविरोधी कोणताही नाविन्यपूर्ण व प्रभावी संदेश या स्पर्धेसाठी सादर करता येणार आहे.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट तीन प्रवेशिकांच्या विजेत्यांचा तसेच त्यांच्या संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे.अंमली पदार्थमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी विद्यार्थी व युवकांची भूमिका महत्त्वाची असून, पिंपरी चिंचवड पोलिसांनी सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी व युवकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.