पिंपरी : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध क्रीडा व शारीरिक तंदुरुस्तीविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या संकल्पनेअंतर्गत रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, निगडी येथे ‘एक घंटा मैदान में’ आणि ‘संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २८ ते ३० ऑगस्टदरम्यान विविध क्रीडा उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रविवारी सकाळी ६ वाजता पोलीस मुख्यालय, निगडी येथून ‘संडेज ऑन सायकल’ सायकल रॅलीला सुरुवात झाली. निगडी पोलीस ठाण्याच्या समोरून पुढे जात कृष्णा हॉटेल, दुर्गा टेकडी चौक, म्हस्के वस्ती चौक (रावेत) असा मार्गक्रमण करून पुन्हा दुर्गा टेकडी चौक, भक्ती-शक्ती चौक मार्गे ही रॅली पोलीस मुख्यालय येथे समाप्त करण्यात आली. सुमारे ५ किलोमीटर अंतराच्या या सायकल रॅलीमध्ये ६२ स्पर्धकांसह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.
यावेळी ‘एक घंटा मैदान में’ या उपक्रमांतर्गतही पोलीस अधिकारी व अंमलदारांनी विविध क्रीडा व शारीरिक व्यायामाच्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम पोलीस सहआयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) श्री. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय नरावाड (कल्याण शाखा), राखीव पोलीस निरीक्षक श्री. गजानन सिंह (मुख्यालय), सहायक पोलीस निरीक्षक श्री. राकेश भामरे (कल्याण शाखा) तसेच पोलीस मुख्यालय, आरसीपी आणि जलद प्रतिसाद पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून पोलीस दलामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा संस्कृती आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.