रस्ते, ड्रेनेज, पाणी, स्ट्रीटलाईट, दवाखाना, पूल व प्रलंबित विकासकामांबाबत नागरिकांच्या तीव्र भावना
पुणे,लोहगाव : प्रतिनिधी….केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मा. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या संकल्पनेतून ‘खासदार सेवा आपल्या दारी’ हा उपक्रम लोहगाव येथे राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा व सेवांचा लाभ मिळवून देण्यात आला. नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे अर्ज भरून देणे, आवश्यक पासेस, परवाने व ओळखपत्रे काढण्यासाठी सहकार्य करण्याचे काम यावेळी करण्यात आले.
यावेळी राजेंद्रदादा खांदवे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संबंधित विभागांकडे नागरिकांच्या समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आवश्यक पाठपुरावा करावा, अशी विनंतीही त्यांनी केली. या उपक्रमामुळे शासकीय कामांसाठी नागरिकांना प्रत्यक्ष मदत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मात्र, शासकीय सेवा देण्याबरोबरच लोहगावच्या मूलभूत विकासकामांकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याची तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली. लोहगावातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, अपुरे राहिलेले भक्ती-शक्ती प्रकल्पाचे काम, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन, स्ट्रीटलाईटची समस्या यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला दवाखाना सर्व सुविधांनी सुसज्ज करून पूर्ण क्षमतेने सुरू करावा, पाण्याच्या टाक्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अर्धवट राहिलेल्या पुलांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली. ठेकेदारांकडून विकासकामांना अपेक्षित गती मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
लोहगाव परिसरातील भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही नागरिकांनी केली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची खंत व्यक्त करत, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्यांची कामे तातडीने करण्याची मागणी करण्यात आली.
नोकरभरती, विकासकामे आणि निधीवाटपाच्या बाबतीत लोहगावला न्याय मिळावा, स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली.
लोहगावच्या विकासाबाबत असलेला असंतोष दूर करून प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने सोडवावे आणि गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, अशी विनंती नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे केली.