सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत विविध मार्गांवर निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पिंपरी, दि.१६ ऑगस्ट : सकल मातंग समाज पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड ते तहसीलदार कार्यालय, निगडी या मार्गावर मातंग जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महामोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विविध मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल जाहीर केले आहेत.
पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड शहर विक्रांत देशमुख यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
पिंपरी वाहतूक विभागाच्या हद्दीत मोरवाडी चौकाकडून महावीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. तसेच अग्रसेन भवनजवळील पुणे-मुंबई ग्रेडसेपरेटर आउटमधून सर्व्हिस रोडमार्गे खंडोबामाळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी राहणार आहे. मोरवाडी चौकाकडून येणारी वाहने झोन-१ कार्यालयासमोरील ग्रेडसेपरेटर इनमधून इच्छितस्थळी जाऊ शकतील. पुणे-मुंबई ग्रेडसेपरेटरमधून थेट भक्ती-शक्ती सर्कलमार्गे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत लोकमान्य हॉस्पिटल ब्रिजवरून महावीर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना, तसेच गंगानगरकडून दळवीनगर ब्रिजखालून बॉम्बे सिलेक्शनकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी राहणार आहे. ग्रिव्हीज कंपनी पंक्चरकडून खंडोबामाळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. संबंधित वाहतूक अहिंसा चौक, गणेश व्हिजन, दळवीनगर ओव्हरब्रिज तसेच ग्रेडसेपरेटरमार्गे पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
आकुर्डी गावठाण, दळवीनगर ब्रिज व थरमॅक्स चौकाकडून खंडोबामाळ चौकाकडे येणाऱ्या वाहनांनाही निर्बंध राहणार आहेत. आकुर्डी गावठाणकडील वाहतूक आंबेडकर चौक, म्हाळसाकांत चौक मार्गे, दळवीनगर ब्रिजकडील वाहतूक गणेश व्हिजनमार्गे आंबेडकर चौकाकडे, तर थरमॅक्स चौकाकडील वाहतूक खडीमशीन वाय-जंक्शनमार्गे परशुराम चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
खंडोबामाळ ग्रेडसेपरेटरमधून तुळजाभवानी पंक्चरमार्गे सर्व्हिस रोडवर येण्यासही बंदी राहणार असून, वाहतूक एस.बी.आय. पंक्चरमार्गे इच्छितस्थळी वळविण्यात येणार आहे.
बजाज अंडरपास परिसरात ब्रह्मा हॉटेलकडून बजाज अंडरपासकडे सर्व्हिस रोडने जाण्यास तसेच बजाज कंपनी गेटकडून अंडरपासमार्गे ब्रह्मा हॉटेलकडे जाण्यास वाहनांना मनाई करण्यात आली आहे. आकुर्डी भाजी मंडई, विठ्ठल मंदिर, आकुर्डी गावठाण मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.
प्रेस्टीज प्लाझासमोरील ग्रेडसेपरेटर आउटमधून सर्व्हिस रोडवर येण्यास बंदी असून, वाहने एस.बी.आय. पंक्चर किंवा भक्ती-शक्ती मार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील. सेंट उर्सुला शाळेकडून प्रेस्टीज प्लाझाकडे जाणारी वाहतूकही बंद राहणार असून, वाहनचालकांनी सावली हॉटेलमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा.
टिळक चौकाकडून भेळ चौक तसेच भक्ती-शक्ती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. ही वाहतूक स्वानंद डेअरी पंक्चर किंवा डाव्या बाजूने खंडोबामाळ चौकाच्या दिशेने वळविण्यात येणार आहे. भक्ती-शक्ती सर्कलवरून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनाही बंदी राहणार असून, बसवेश्वर पुतळा–अप्पूघर चौक–मुकाई चौक किंवा भक्ती-शक्ती सर्कल क्रमांक २–अंकुश चौक मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.
वाहनचालकांनी सहकार्य करावे
महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेडिंग व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.