पिंपरी-चिंचवड : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वाकड येथील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य तीन ते चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार भूमकर हे आपल्या फॉर्च्युनर कारमधून पुण्याहून मुंबईकडे जात होते. ‘मिसिंग लिंक’ बोगद्यातून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाने पुढे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातात कारमधील इतर तीन ते चार प्रवासी जखमी झाले. त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उर्वरित तिघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. तुषार भूमकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणाची नोंद पोलिसांनी केली आहे. अपघातामुळे काही काळ बोगद्यात वाहनांच्या रांगा लागल्याचेही सांगण्यात आले.
तुषार भूमकर हे वाकड आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित होते. त्यांच्या पत्नीने यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून महापालिका निवडणूक लढवली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे वाकड परिसरात शोककळा पसरली असून विविध राजकीय, सामाजिक आणि नागरिक स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
