१० ते १५ ऑगस्टदरम्यान विविध देशभक्तीपर उपक्रम
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा – तिरंगा यात्रा’ अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याची विशेष बैठक पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ स्तरावर अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाचे जिल्हा संयोजक मोरेश्वर शेडगे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी विधान परिषद आमदार उमा खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, सरचिटणीस विकास डोळस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बैठकीस मधुकर बच्चे, वैशाली खाड्ये, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव, सहसंयोजक अजित कुलथे, मंडळ अध्यक्ष गणेश ढोरे, मोहन राऊत, मंगेश धाडगे, सनी बारणे, जयदीप खापरे, सोमनाथ तापकीर, हर्षल ढोरे, धरम वाघमारे, अजय साने, प्रवक्ते कुणाल लांडगे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अभियानांतर्गत १० ते १३ ऑगस्टदरम्यान युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या पुढाकाराने विधानसभा स्तरावर भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. देशभक्तीपर गीते, आकर्षक सजावट आणि विविध सामाजिक घटकांच्या सहभागातून या यात्रा आयोजित करण्यात येतील. यामध्ये माजी सैनिक, सुरक्षा कर्मचारी, सामाजिक संस्था तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
याशिवाय शहीद स्मारके व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे, शहीद सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे, तसेच १३ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर कापडी तिरंगा ध्वज फडकविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहणाचे फोटो व व्हिडिओ विविध डिजिटल माध्यमांवर प्रसारित केले जाणार असून, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रध्वजाचा सन्मानपूर्वक अवतरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ निमित्त मौन मिरवणूक, छायाचित्र प्रदर्शन, व्याख्यान आणि चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येणार असून, फाळणीच्या वेदना भोगलेल्या कुटुंबीयांनाही भेट देण्यात येणार आहे.
यंदा ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार असून, राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि ‘राष्ट्र प्रथम’चा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
