पिंपरी, दि.०४ ऑगस्ट : परराज्यातील मजुरांना एकटे गाठून मारहाण करत त्यांच्या मोबाईलमधून जबरदस्तीने ऑनलाइन पैसे हस्तांतरित करणाऱ्या सराईत टोळीतील दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने अटक केली आहे. या कारवाईत जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून तीन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०२६ रोजी महाळुंगे-तळवडे रोडवरील महिंद्रा कंपनी गेट क्रमांक १ येथे दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी एका व्यक्तीला अडवून त्याचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर पीडिताचा मोबाईल फिंगरप्रिंटने उघडून त्याच्या फोनपे खात्यातून जबरदस्तीने २५ हजार रुपये आरोपींच्या गुगल पे क्यूआर कोडवर हस्तांतरित केले. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान आरोपींनी वापरलेला गुगल पे असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे तसेच हस्तांतरित केलेले पैसे विविध मनी ट्रान्सफर केंद्रांतून रोख स्वरूपात काढल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि सखोल तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढला.
त्यानुसार, केशव दशरथ शेटे (वय ४६, रा. कुदळे कॉलनी, पिंपरी गाव) आणि राजेश अनिल कुमार (वय ४५, रा. ताडीवाला रोड परिसर, पुणे स्टेशनजवळ) यांना ३ ऑगस्ट रोजी पिंपरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी इतर दोन साथीदारांसह दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यातील दोन आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एक अशा जबरी चोरीच्या एकूण तीन गुन्ह्यांची कबुली दिली.
तपासात आरोपी सुट्टीच्या दिवशी, विशेषतः गुरुवार व रविवारी, परराज्यातील मजुरांना एकटे गाठून त्यांच्याकडून मारहाण व दमदाटी करून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात पैसे उकळत असल्याचे समोर आले. ऑनलाइन व्यवहारासाठी ते चोरीच्या मोबाईलवरील गुगल पे खात्याचा वापर करत आणि नंतर मनी ट्रान्सफर केंद्रांतून रक्कम काढत असत.
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध सांगवी, पिंपरी, खडकी तसेच बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत चोरी, घरफोडी, जबरी चोरी आदी स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली व सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत व त्यांच्या पथकाने केली.
