७ मोटारसायकली व २४ मोबाईल फोन हस्तगत; बावधन, हिंजवडी व शिरगाव-परंदवडीतील ७ गुन्ह्यांची उकल
पुणे,बावधन, प्रतिनिधी : बावधन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटारसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपी आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ७ मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, बावधन, हिंजवडी आणि शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यांतील एकूण सात चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने विशेष मोहीम हाती घेतली.
म्हाळुंगे-नांदे रोड परिसरात पेट्रोलिंगदरम्यान नंबर प्लेट नसलेल्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत अनिल लहु जाधव (वय २०, रा. म्हाळुंगे) आणि एका विधीसंघर्षित बालकाची नावे समोर आली.
कसून चौकशीदरम्यान अनिल जाधव याने साथीदार वसंत अंकुश जाधव (वय २५) व सुनील लहु जाधव (वय २५, दोघेही रा. सुतारवाडी, ता. मुळशी) यांच्या मदतीने बावधन व हिंजवडी परिसरात मोटारसायकल आणि मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत बावधन पोलीस ठाण्याचे चार, हिंजवडी पोलीस ठाण्याचे दोन आणि शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याचा एक अशा एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) परवेज शिकलगार तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
