ज्ञानेश्वर जैसवालसह तिघांना अटक; सुमारे १५.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे,वाकड प्रतिनिधी: वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे १५.५० लाख रुपये किमतीच्या २५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे १७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कारवाई केली.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ज्ञानेश्वर शंकरराव जैसवाल (वय ४६, रा. आळंदी देवाची) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गेल्या दोन वर्षांत पिंपरी-चिंचवड तसेच परिसरातून अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २३ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
याशिवाय वेदप्रकाश मदनसिंग रावत (रा. ताथवडे) याच्याकडून चोरीची एक अॅक्टिव्हा, तर संतोष मोहन मांगीलवार (रा. वेणूनगर, वाकड) याच्याकडून चोरीची एक ज्युपिटर मोपेड जप्त करण्यात आली.
या कारवाईत वाकड, आळंदी, चाकण, संत तुकारामनगर, शिक्रापूर (पुणे ग्रामीण) आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण १७ वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पोलीसांनी जप्त केलेल्या काही दुचाकींची मालकी अद्याप निश्चित झालेली नसून संबंधित वाहनमालकांचा शोध सुरू आहे. आरोपी ज्ञानेश्वर जैसवाल हा खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करत असून फिरण्यासाठी दुचाकी चोरी करून वापरत असे आणि नंतर ती सोडून दुसरी दुचाकी चोरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.
