पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी तथा पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (वय ९०) यांचे निधन झाल्याने शिक्षण, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या शैक्षणिक संस्थांनी देशासह परदेशातही नावलौकिक मिळवला असून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. “डॉ. डी. वाय. पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल. त्यांच्या जाण्याने राज्याने दूरदृष्टी असलेले शिक्षणमहर्षी गमावले आहेत,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप येथे एका साध्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि पुढे शिक्षण, समाजकारण तसेच राजकारण या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच महाराष्ट्र शासनात मंत्री म्हणूनही त्यांनी विविध पदांवर काम केले.
देशभरात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने त्यांनी डी. वाय. पाटील समूहाची स्थापना केली. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये त्यांनी शाळा, महाविद्यालये, अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, व्यवस्थापन आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांची उभारणी करून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
शिक्षण आणि समाजकारणातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्काराने गौरविले होते.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिघडलेली होती आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते. अखेर मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबीयांवर, त्यांच्या शैक्षणिक संस्थांशी निगडित विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच असंख्य हितचिंतकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना व्यक्त करत सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
