निगडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….निगडी पोलीस स्टेशनने दाखल केलेल्या पोक्सो प्रकरणात न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील प्रभावी तपास आणि न्यायालयीन पाठपुराव्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा झाली.
निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२० अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३७६ सह ५११, ३५४(ब), ३२३, ५०६ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४ सह १८, ७, ८, ११ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल मा. विशेष (पोक्सो) न्यायाधीश श्रीमती संध्या नायर यांनी २८ जुलै २०२६ रोजी दिला. आरोपी मोहन चिनप्पा उर्फ कॅचप्पा कुऱ्हाडे (वय ३३, रा. अजंठानगर, चिंचवड) याला दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
अल्पवयीन पीडितेवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नानंतर निगडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून सखोल तपास केला. तपासादरम्यान पीडितेचा जबाब, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे, घटनास्थळ पंचनामा तसेच इतर आवश्यक दस्तऐवजी पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. अभियोजन पक्षाने प्रभावीपणे बाजू मांडल्याने न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. घाटे यांनी केला. न्यायालयीन कामकाजात विशेष सरकारी अभियोक्ता पी. एस. अग्रवाल यांनी शासनाची बाजू प्रभावीपणे मांडली.
प्रकरणाच्या न्यायालयीन पाठपुराव्यासाठी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गोविंद मरभळ आणि पोलीस शिपाई अनिल जगताप यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये प्रभावी तपास करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अशा घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन घोडेपाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गाँधे यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.