निगडी प्रतिनिधी: बँक खाते उघडून साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपीच्या खात्यावर तब्बल १ लाख १३ हजार रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी सुमित मारुती मोरे, पोलीस शिपाई क्रमांक २४०२, निगडी पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश मधुकर जवरे (वय २१, रा. गणेशकॉलनी, गणेश मंदिराजवळ, बिजलीनगर, चिंचवड गाव, पुणे) याच्यासह इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ते दि. ३० जून २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्र, आकुर्डी येथे खाते क्रमांक ६०५६११६१७६७ हे खाते उघडले. त्यानंतर साथीदारांसोबत संगनमत करून ग्रुपमधील सभासद म्हणून या खात्यावर आर्थिक व्यवहार करण्यात आले.
तपासादरम्यान या खात्यावरून भारतामधील दोन नागरिकांच्या तक्रारींशी संबंधित एकूण १ लाख १३ हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.