लहान फलकामुळे रुग्णांची होते गैरसोय; नागरिकांची महापालिकेकडे जोरदार मागणी
पिंपरी | प्रतिनिधी....पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या धर्तीवर जिजामाता रुग्णालयालाही भव्य, आकर्षक आणि दूरवरून सहज दिसेल अशी नामनिर्देशक कमान उभारण्यात यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सध्या जिजामाता रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेला नावाचा फलक अत्यंत लहान असल्याने अनेक नागरिकांना रुग्णालयाचे नेमके ठिकाण ओळखणे कठीण जाते. विशेषतः प्रथमच उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच आपत्कालीन परिस्थितीत येणाऱ्या नागरिकांना रुग्णालय शोधताना मोठी अडचण निर्माण होते.
पिंपरी, काळेवाडी, पिंपरी गाव, पिंपरी कॅम्प, भाटनगर, डिलक्स टॉकीज परिसर तसेच आसपासच्या भागांतून दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी जिजामाता रुग्णालयात येतात. मात्र, रुग्णालयाचा फलक दूरवरून स्पष्टपणे दिसत नसल्याने अनेकांना चौकशी करत रुग्णालय गाठावे लागते.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाप्रमाणेच जिजामाता रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आधुनिक, आकर्षक, प्रकाशयुक्त आणि मोठ्या अक्षरांतील नामनिर्देशक कमान उभारल्यास रुग्णालयाची ओळख अधिक ठळक होईल. तसेच आपत्कालीन सेवेसाठी येणाऱ्या रुग्णांचा मौल्यवान वेळही वाचेल.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन जिजामाता रुग्णालयासाठीही भव्य नामनिर्देशक कमान उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
