पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करणाऱ्या वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ₹३ लाख ७६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वाहतूक शाखेने आरटीओ कार्यालयाशी समन्वय साधून दि. २९ जून, ३० जून, २ जुलै आणि २० जुलै २०२६ रोजी संयुक्त विशेष मोहीम आयोजित केली. या कारवाईत आरटीओच्या वायुवेग पथकानेही सहभाग घेतला.
ही मोहीम पिंपरी, वाकड, सांगवी, महाळुंगे, चिखली, तळवडे आणि हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत राबविण्यात आली. या चार दिवसांच्या मोहिमेदरम्यान एकूण १८१ शालेय वाहने तपासण्यात आली. त्यापैकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी शाळा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना व वाहनमालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता सर्व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या संयुक्त विशेष मोहिमा भविष्यातही सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक-२) सत्यजित आदमणे तसेच वाहतूक विभागातील प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी या संयुक्त मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली.
