पिंपरी, दि. २० जुलै : बँक ऑफ बडोदाच्या ११९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर रवि लांडगे यांनी उपस्थित राहून या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी विविध सामाजिक संस्था, बँका आणि स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेत अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी महापौर रवि लांडगे यांनी शिबिराची पाहणी करून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला तसेच वैद्यकीय पथकाकडून करण्यात येणाऱ्या विविध आरोग्य तपासण्यांची माहिती घेतली. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, बदलती जीवनशैली, वाढता ताण आणि विविध आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत तपासणी झाल्यास अनेक गंभीर आजारांचे प्रारंभीच निदान होऊन त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घेऊन स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.
प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे, नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सल्ला मिळवून देणे आणि आरोग्यदायी समाज निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक बांधिलकी जपत बँक ऑफ बडोदाने आपल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राबविलेला हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
समाजाप्रती असलेली सामाजिक जबाबदारी जपत हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल बँक ऑफ बडोदा, पिंपरी-चिंचवड शाखेचे मुख्य व्यवस्थापक डॉ. अभिषेक परमार, अमोल धावरे, अश्विनी राठोड, संपदा देशपांडे, आरती गायकवाड तसेच या उपक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाचे महापौर रवी लांडगे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
