चिंचवड, दि. १४ जुलै २०२६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. डांबर उखडल्याने आणि रस्त्यावरील खडी सुटल्याने दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे भापकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
मोरवाडी ते चिंचवड रेल्वे स्थानक सेवा रस्ता, भुयारी मार्ग तसेच शहरातील विविध रस्त्यांवर “रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ते” अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत सुमारे २,०७३ किलोमीटर लांबीचे रस्ते असून नव्याने तयार केलेले काही रस्तेही पावसात उखडून गेल्याने कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पिंपरी, चिंचवड, निगडी, भक्ती-शक्ती चौक, रावेत, स्पाईन रोड, मोशी, भोसरी, सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, चिखली आणि आकुर्डी परिसरासह रावेत–औंध बीआरटी मार्ग व नाशिक फाटा ते संत तुकारामनगर मेट्रो स्थानक दरम्यानच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
या परिस्थितीसाठी संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि सल्लागार यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत भापकर यांनी स्वतंत्र तांत्रिक चौकशी, दोषींवर कायदेशीर कारवाई, करारातील दोषदायित्व अटींनुसार कंत्राटदारांकडून दुरुस्ती आणि रस्त्यांच्या गुणवत्तेचे तृतीय पक्षामार्फत परीक्षण करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संपूर्ण शहरातील खड्डे युद्धपातळीवर बुजवावेत, अशीही त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे.
