“पुनावळे डेपोला विरोध करणारेही मोशी दुर्घटनेला जबाबदार; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी”
पिंपरी | प्रतिनिधी…..मोशी कचरा डेपोवरील भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत मोशी कचरा डेपो तात्काळ बंद करून पुनावळे कचरा डेपो कार्यान्वित करण्याची जोरदार मागणी केली आहे.
निवेदनात वाघेरे यांनी म्हटले आहे की, मोशी कचरा डेपो १९८२ पासून सुरू असून तब्बल ४४ वर्षांपासून शहराचा कचरा येथे टाकला जात आहे. डेपोची क्षमता सुमारे १५ वर्षांपूर्वीच संपली होती. तरीही तो सुरू ठेवण्यात आल्यानेच आजची भीषण दुर्घटना घडली असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला, असा आरोप त्यांनी केला.
वाघेरे यांनी नमूद केले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने १९९७ मध्ये पुनावळे येथे कचरा डेपोचे आरक्षण केले असून २००६ मध्ये शासनाकडे चार कोटी रुपयेही जमा केले होते. तरीही विविध कारणांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही.
यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत पुनावळे कचरा डेपोला विरोध करणारे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार हे देखील मोशी दुर्घटनेस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच २०१२ मध्ये तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात पुनावळे डेपो सुरू करण्यासाठी आपण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण व निवेदन दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
पुनावळे परिसरात मोठ्या बिल्डर आणि राजकीय व्यक्तींनी जमिनी घेतल्यामुळेच हा प्रकल्प रखडला, असा आरोप करत त्यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीही मोशी कचरा डेपो बंद करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले नाहीत, असा दावा केला आहे.
यासोबतच मोशी कचरा डेपो तातडीने बंद करून पुनावळे डेपो सुरू करावा आणि पुनावळे डेपोला विरोध करणाऱ्यांवर मोशी दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
