दुर्घटनेच्या काळात वारीतील व्हिडिओ व्हायरल; प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर नागरिकांचा सवाल
पिंपरी | प्रतिनिधी….मोशी कचरा डेपो येथे भीषण इमारत दुर्घटना घडून बचाव पथके जीव धोक्यात घालून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असतानाच, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी वारीतील कार्यक्रमात कर्मचाऱ्यांसोबत फुगडी खेळताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर आणि प्राधान्यक्रमावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मोशी येथील दुर्घटनेत महापालिकेचे अकाउंटंट भावेश वाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांकडून बचावकार्य सुरू असतानाच आयुक्तांचा फुगडी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गंभीर दुर्घटनेच्या वेळी महापालिकेच्या सर्वोच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचा आढावा घेणे, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधणे आणि पीडित कुटुंबीयांना धीर देणे अपेक्षित असते. मात्र अशा संवेदनशील क्षणी सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागाचा व्हिडिओ समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सोशल मीडियावरही या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, “एका बाजूला जीव वाचविण्याची धडपड आणि दुसऱ्या बाजूला फुगडीचा फेर… हा कोणता प्राधान्यक्रम?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ नेमका दुर्घटनेपूर्वीचा की दुर्घटनेनंतरचा, याबाबत महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणावर आयुक्तांची भूमिका काय असणार आणि प्रशासन याबाबत काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
