७५ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन; सामाजिक बांधिलकीचा आदर्श
पिंपरी-चिंचवड, : समाजकार्य, सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत ज्येष्ठ नागरिक संघाच्या सक्रिय सदस्य तथा वीरपत्नी श्रीमती शकुंतला देविदास चरडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ज्येष्ठ नागरिक कार्यालय, के-टाउन, पोलीस आयुक्तालय, विकासनगर, किवळे येथे आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अमृत महोत्सवानिमित्त सकाळच्या सत्रात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोफत रक्तदान, आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिरात १५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडविले. तर ५५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि ८० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवक आणि रक्तदात्यांचे विशेष योगदान लाभले.
सायंकाळी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात नातेवाईक, मित्रपरिवार, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री. एम. डी. चौधरी व ग्रुप यांच्या “मेरी आवाज सुनो” या बहारदार ऑर्केस्ट्रा सादरीकरणाने झाली. आकर्षक नृत्याविष्कार, केक कापण्याचा सोहळा आणि कुटुंबीय व मित्रपरिवाराने व्यक्त केलेल्या भावनिक मनोगतांमुळे संपूर्ण सभागृह आनंद आणि भावनांनी भारावून गेले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीमती शकुंतला चरडे यांच्या समाजसेवा, कुटुंबवत्सल स्वभाव, संस्कारमय जीवनप्रवास आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांच्या निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी जीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
कार्यक्रमास प्रभागाचे नगरसेवक निलेश तरस, धर्मपाल तंतरपाळे, सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस, राजेंद्र तरस, सौ. रेश्मा बापू कातळे, बापू कातळे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रविण चरडे व प्रशांत चरडे परिवाराने या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान, आरोग्य सेवा आणि नेत्र तपासणीसारखे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची संकल्पना उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली. सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक उत्सव यांचा सुंदर मिलाफ असलेला हा अमृत महोत्सव उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
