स्वाभिमानी सामाजिक महिला संस्था,लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा संयुक्त उपक्रम
पुणे : स्वाभिमानी सामाजिक महिला संस्था, लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा परिसरातील गरीब व गरजू महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्रचे असिस्टंट जनरल मॅनेजर प्रमोद साबळे आणि सिनियर मॅनेजर दिनकर बुधे यांनी स्वयंरोजगारासाठी उपलब्ध विविध प्रशिक्षण योजना व बँकेच्या कर्ज योजनांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी महिलांना कागदी व कापडी पिशव्या तयार करणे, कापडी पर्स बनविणे, आरी वर्क, शिवणकाम तसेच विविध लघुउद्योगांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी बँकेच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहनही मान्यवरांनी केले.
कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक लिंगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सिरिल आशिर्वादम, केशव जाधव, श्रीराम क्षीरसागर, मनोज अँन्थोनी, चेतन गवळी तसेच परिसरातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन स्वाभिमानी सामाजिक महिला संस्थेच्या अध्यक्षा ज्योतीताई विल्सन चंदेवळ यांनी केले. महिलांना रोजगारक्षम बनवून त्यांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण व मार्गदर्शन उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
