पिंपरी, दि. १८ जून २०२६ : अभिनेत्री तथा खासदार कंगना रानौत निर्मित ‘भारत भाग्य विधाता’ हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपटाच्या टीमने गुरुवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज तापडिया, निर्मात्या बबीता अशीश्वाल तसेच अभिनेत्री गिरिजा ओक आणि स्मिता तांबे उपस्थित होत्या. भेटीदरम्यान चित्रपटाच्या निर्मितीमागील संकल्पना, कथानक आणि समाजाभिमुख विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महापौर रवि लांडगे यांनी चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा देत संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. चित्रपट हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत त्यांनी ‘भारत भाग्य विधाता’ सारखे चित्रपट समाजात सकारात्मक विचार रुजविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद केले.
“अशा आशयघन आणि प्रेरणादायी चित्रपटांच्या माध्यमातून देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्यांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचतो. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,” असे महापौर लांडगे यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी महा मेट्रो पीसीएमसीच्या ब्रँड ॲम्बेसेडर संगीता तरडे तसेच जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. चित्रपटाच्या टीमने महापौरांशी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरही संवाद साधला.
