मंठा, दि.१८ जून (प्रतिनिधी): अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मंठा पोलिसांनी रविवारी दोन स्वतंत्र कारवाया करत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत १४४ देशी दारूच्या बाटल्या, दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई वेवरई पाटी परिसरात करण्यात आली. संशयास्पदरीत्या मोटारसायकलवरून जात असलेल्या ईरसान आगाखाँ पठाण (रा. पाटोदा, ता. मंठा) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे ९६ देशी दारूच्या बाटल्या आणि हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल आढळून आली. या प्रकरणात ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (अ), (आ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई विडोळी फाटा येथे करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून रवी हनुमंतराव सूर्यवंशी (रा. धारे कोल्होणी, ता. मंठा) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून ४८ देशी दारूच्या बाटल्या व हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल असा ५९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ३१७/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १४४ देशी दारूच्या बाटल्या आणि दोन मोटारसायकली जप्त करत अवैध दारू वाहतुकीच्या साखळीवर मोठा आघात केला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेते आणि वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली असून, हद्दीतील अवैध धंद्यांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे मंठा पोलिसांनी स्पष्ट केले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
